top of page
Search

Diet and Regimens of Monsoon Season (वर्षा ऋतुचर्या) in Marathi

आला पावसाळा आरोग्य सांभाळा (वर्षा ऋतुचर्या)

- Dr.Yogesh Chavan, MD (Ayu.Kerala)


आयुर्वेद प्रामुख्याने कुठलाही आजार होण्यास प्रतिबंध व्हावा यावर जास्त जोर देतो, व यामुळेच दिनचर्या, ऋतुचर्या, आहार यांचे सविस्तर वर्णन आयुर्वेद संहीतांमध्ये अढळुन येते. ऋतुमान बदलले की शरीरावर त्याचे काही चांगले तर काही विपरीत परीणाम दिसुन येतात अशा वेळी त्या ऋतुनुसार दिनचर्येत व आहारात बदल केल्यास ऋतुबदलाचा शरीरावर फारसा परीणाम होत नाही व शरीरबल व व्याधिक्षमत्व उत्तम राहते.

अशा ऋतुनुसार राहणीमान व आहारातील बदलांचे सविस्तर वर्णन आयुर्वेदात आहे व यास ऋतुचर्या असे म्हटले जाते.


Avoid Diseases in Rainy Season with Ayurvedic Rutucharya

ग्रीष्म ऋतुनंतर येनारा वर्षा ऋतु हा सर्वप्रकारे ग्रीष्माच्या विपरीत असतो. ग्रीष्मातील सर्वांगाची लाही लाही करणारी उष्णता थंडाव्यात बदलते, हवेतील रुक्षतेच्या जागी आता आर्द्रता आपली उपस्थीती दाखवु लागते. वातावरण शीत व उल्हसित करणारे होते व कवींचा व प्रेमी युगुलांचा आवडता रोमॅंटीक ऋतु सुरु होतो. सुरुवातीला हवाहवासा वाटणारा हा ऋतु चांगल्या बदलांसोबत काही वाईट बदल देखिल सोबत घेऊन येतो व यामुळे नंतर मात्र शरीरबल कमी करुन व्याधी उत्पन्न होण्यास अनुकुल ठरतो.


हवेतील आर्द्रता व सुर्यकिरनांचा अभाव हा जीवाणु, विषाणुंच्या वाढीसाठी पोषक असते यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमान वाढु लागते व त्यामुळेच सर्व डॉक्टर या ऋतुची आतुरतेने वाट बघत असतात. परंतु आयुर्वेदाने हजारो वर्षांपुर्वी या ऋतुतील बदलांविरुद्ध राहणीमान व आहार कसे बदलायचे याचे वर्णन करुन ठेवले आहे.

वर्षाऋतु हा उत्तरायना मधे येणारा ऋतु असुन या काळात शरीर बल हे कमी असते तसेच जाठरग्नि मंद झाल्यामुळे पचन शक्ती देखिल मंदावते व यामुळेच रोगप्रतिकार शक्ती देखिल कमी होते.

हा काळ वात दोषाच्या प्रकोपाचा असुन या काळात शरीरातील वात वाढतो व तो वातविकारांना वाढवतो किंवा उत्पन्न करतो. पचनशक्ती कमी झाल्याने पचनाचे विकार बळावतात. वात प्रकोपास पोषक वातवरण असल्यामुळे वाढलेला वात हा संधीवात, आमवात,

दमा, मनक्यांचे विकार, ज्वर, त्वचाविकार अशा आजारांना उत्पन्न करतो किंवा वाढवतो. तसेच या काळातील दुषित पाण्यामुळे देखिल अतिसार, काविळ, त्वचाविकार, मलेरिया, टायफॉइड असे विकार उत्पन्न होतात. यासाठी हे सर्व टाळण्यासाठी व वर्षा ऋतुमधे देखिल आरोग्य चांगले राहण्यासाठी आयुर्वेद ग्रंथांमधे विशिष्ट आहार व राहणीमान यांचे पालन करण्याचे निर्देश दिलेले आहेत.


वर्षाऋतुमधे आहार कसा असावा- ( Diet in Monsoon Season)



- आहार हा ताजा व गरम सेवन करावा, फ्रीज मधील पदार्थ, पेय व भाज्या खाने टाळावे. त्याने या ऋतुमधे वात व कफ वाढुन वात विकार तसेच सर्दी चटकन होते.


- वेगवेगळ्या दाळींचे किंवा मांस पदार्थांचे युष ( सुप) हे पाचक व जाठराग्निवर्धक असल्याने त्यांचे सेवन करावे. वातवर्धक आहार टाळावा. कडु, तुरट व तिखट चवीचे पदार्थ या ऋतुत कमी प्रमाणात सेवन करावेत.


- हलके मसाले जसे लसुन, आले, हींग हळद, मिरे यांचा सुयोग्य वापर आहारात करावा.

Diet and regimen of Rainy season


- आहारात पचण्यास हलक्या व ताज्या पदार्थांचा समावेश करावा, यात तांदुळ, गहु तसेच विविध दाळी भाजुन यांपासुन वेगवेगळे आहार पदार्थ बनवुन त्याचे सेवन करावे.


- या ऋतुमधे मांसाहार टाळावा व मासे तर पुर्णपणे टाळावेत कारण पचनशक्ती मंद असते तसेच मांस देखिल दुषित असण्याची संभावना अधिक असते, यामुळेच या कालावधीत श्रावण कींवा चातुर्मासाचे पालन केले जाते.


- हीरव्या पालेभाज्या या ऋतुमधे दुषित असतात व त्यावर जीवाणु, विषाणुंची अतिरिक्त वाढ होत असते, त्यावर अळ्या व लार्वा यांचीही वाढ होत असते तसेच या कालावधित असा भाजीपाला वातवर्धक असतो त्यामुळे तो कमी खावा व खाताना स्वच्छतेची चांगली काळजी घ्यावी.


- आहारातील तिखट व अंबट पदार्थांचा वापर कमी करावा. लोनचे, चिंचेचे पदार्थ हे आहारातील स्वाद वाढवतात परंतु या कालावधित यांचे सेवन त्रासदायक ठरु शकते.


- या कालावधीत बाहेरचे तळलेले व चमचमीत खाद्य पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते परंतु त्याने पचनाचे व इतर आजार वाढु शकतात त्यामुळे भजी, वडापाव, चाट असे पदार्थ टाळलेले जास्त चांगले.


राहणीमान (विहार) कसे असावे- ( Lifestyle in Monsoon Season)


- या ऋतुमधे जास्त पावसात जाणे टाळावे जाणे झालेच तर छत्री/ रेन कोट यांचा वापर करावा घरी परत आल्यावर अंग व केस पुर्ण कोरडे करावे, पावसात अधिक भिजणे टाळावे.


- कपडे योग्य न सुकल्यामुळे बर्‍याचदा त्यात आर्द्रता असते व असे कपडे परीधान केल्यास त्वचा विकार होण्याचा संभव असतो त्यामुळे परीधान करन्याचे सर्व बाह्य व अन्तर्वस्त्र चांगले सुकवुन मगच वापरावेत.


- दिवसा झोपणे टाळावे. दिवसा घेतलेली झोप कफवर्धक असते व ती वर्षा ऋतुत कमी झालेली पचनशक्ती अजुन कमी करन्यास मदत करते.


- घरातील वातावरण स्वच्छ व कोरडे ठेवावे, आजुबाजुस पाणी जास्त काळ जमा होऊ देऊ नये. घरामधे अगरु, गुग्गुळ, चंदन यांनी धुपन केल्यास जंतुसंसर्ग कमी होतो व वातवरण सुगंधी व आल्हाददायक राहते. आजुबाजुचा परीसर स्वच्छ ठेवुन डासांच्या उत्पत्तीस प्रतिबंध घालावा.


- स्नानापुर्वी शरीरास कोमट तेलाने अभ्यंग करने वातनाशक आहे त्यामुळे या दिवसांत तीळ तेलाने अभ्यंग करावे.


- अपरीचीत जलाशयात स्नान करणे टाळावे कारण अशा जलाशयाचा खोलीचा अंदाज नसल्याने जीवास धोका उत्पन्न होऊ शकतो.


- या ऋतुमधे प्रकुपित झालेल्या वाताच्या चिकित्सेसाठी बस्ती या पंचकर्माचे वर्णन आयुर्वेद ग्रंथांमधे केले आहे. बस्ती ही वाताची उत्तम चिकित्सा असुन याने वाताची अर्धी चिकित्सा त्वरीत होते यामुळे या ऋतुत बस्ती हे पंचकर्म करुन घ्यावे.


- जास्त शारीरीक श्रम करणे टाळावे, रात्री जागरन करु नये तसेच मद्यपान टाळावे किंवा कमी प्रमाणात करावे असे वर्णन आयुर्वेद ग्रंथामधे आहे.

वर्षा ऋतु हा आजार होण्यास पोषक ऋतु आसल्याने सर्वात जास्त साथीचे किंवा संसर्गजन्य आजार या दरम्यान होतात योग्य ऋतुचर्या पाळल्यास व योग्य काळजी घेतल्यास आजारांचा हा ऋतु आनंदी, आल्हाददायक व निरोगी जाईल व तो तसा जावो अशी शुभेच्छा.




Komentarze


bottom of page